पिशाचादि अज्ञानी योनीना सुद्धा सात्वीकतेचा पान्हा फोडून , शुध्द अंत:करण्या च्या लोकांना समाधी अवस्थेप्रत पोहोचविण्याचे काम करणारे प्रभुभाषी असे अनेक कवींना लाजविणारे कवित्व ,
तब्बल चौदा वेळा काळाला परत पाठविणाऱ्या योगीराज विद्वदवरिष्ठ तत्त्वज्ञानी चांगदेवांनाही नामोहरम करणारी विद्वत्ता आणि जिच्या प्रेमाला पर्याय नाही अशा अनेक आईंना लाजवेल असे निष्काम प्रेमाचे आगर असल्यामुळेच नुसते वारकरी संप्रदायिकच नाही तर , समग्र विश्व भगवान श्री ज्ञानोबारायांना माऊली म्हणते असे निष्ठापूर्ण मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेव जी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भगवान श्री ज्ञानोबारायांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्ताने आयोजित सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाच्या सांगता प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की वेदशास्त्रादिकांचा सांङ्गोपांङ्ग अभ्यास केलेल्या सिद्ध महापुरुषांची , अष्टांगांदि योगाची साधना सिद्ध झालेल्या योग्यांची , आत्मोद्धाराच्या साधनेतरत असणाऱ्या साधकांची तसेच ज्यांना कोणीच जवळ करीत नाही अशा अनाथांची सुद्धा ज्ञानोबाराय आई असून ; त्यातील सिद्धार्थ करिता सिद्धांनुवाद असणारा आत्मसंवादात्मक अमृतानुभव , तर योग्यांकरिता मित्र संवादात्मक चांगदेव पासष्टी , साधकांकरीता श्रोतृसंवादात्मक ग्रंथराज ज्ञानेश्वरी व सर्वसामान्य करिता जनसंवादात्मक हरिपाठ नामक ग्रंथांची निर्मिती करून , त्या चारही बालकांना यावद्चंद्र दिवाकरो पुरून उरेल अशी अक्षर स्वरूप गंगाजळी निर्माण केली. त्यांच्याकडे आईप्रमाणे सर्व बालकांवर प्रेम करणारे समत्व , संपूर्ण विश्वाला माझे घर म्हणण्या एवढे ममत्व , त्यातील सर्वांविषयी जिव्हाळा व त्या सर्वांचा उद्धार होण्याएवढा कळवळा आहे. ते प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा अवतार असून , त्यांच्यामध्ये अवतार या शब्दातील चार अक्षरांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या अ- अंतर्यामीत्व , व- वरदत्त्व , ता – तारकत्व आणि र – रक्षकत्व ह्या चारही गोष्टी पाहण्याकरता मिळतात . ज्यावेळी स्पृश्यास्पृश्य भेदाभेद हा इतक्या टोकाला जाऊन पोचलेला होता की ! माणसाचा माणसाला स्पर्श झाल्यानंतर माणस बाट मानित होते यात नवल नाही तर ; सावलीला सावली जरी लागली तरीही कपड्यासहित सचैलस्नान करण्याची परंपरा ज्या कालखंडामध्ये अस्तित्वात आलेली होती . अशा विशाक्त परिस्थितीत त्यांनी अवतार धारण करून अठरा पगड जातीच्या सर्वच जीवमात्रांना भक्तीच्या झेंड्याखाली एकत्रित आणून , वैष्णवांची मांदियाळी निर्माण करून विश्वबंधुत्वाची मुहूर्तमेढ रोवली. या क्रांतिकारक कार्याची साहित्यिक विश्वातील विद्वानांनी विशेषत्वाने दखल न घेता केवळ त्यांच्या जीवन चरित्रातील केवळ चमत्कारांनाच प्रश्नार्थक चिन्हांकित करून समाजाचा बुद्धिभेद करण्याचे काम केल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली . तसेच मेळविली मांदी वैष्णवांची l या विषयावर पारमार्थिकक्षेत्रा व्यतिरिक्त क्षेत्रातील लोकांनी अर्थातच साहित्यिक , पत्रकार प्रवक्ते व विचारवंतांनी भाष्य करण्याला भरपूर वाव असल्याचे ते यावेळी म्हणाले. शके १२१२ मध्ये जगद्मान्य अद्वितीय स्वरूप ज्ञानेश्वरी नामक ग्रंथ विश्वात्मक असणाऱ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करून पसायदानाच्या माध्यमातून जगताचा आकृतीबंध सत्यं शिवं सुंदरम् l व्हावा याकरिता विश्वशांतीची प्रार्थना केली. आणि कार्तिक वद्य १३ शके १२१८ ला भगवान श्री पांडुरंग परमात्मा व श्रीगुरु निवृत्तीनाथांनी त्यांना श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणीच्या तीरावर स्वहस्ते संजीवन समाधी दिली.असे अनेक संदर्भ देऊन उपस्थिततांना ज्ञानोबारायांच्या अवतार कार्याविषयी महाराजांनी आपल्या ओघवत्या वाणीने मार्गदर्शन केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात .
